Ladki Bahin Yojana Gift: महाराष्ट्र राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही महिलांसाठी गेमचेंजर ठरत आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या मुंबईतील महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. या महिलांना आता शून्य टक्के व्याजदराने १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनी मिळालेले पैसे केवळ दैनंदिन खर्चासाठी न वापरता, त्या पैशातून उद्योग-व्यवसाय सुरू करून ते पैसे बाजारात आले पाहिजेत, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यानुसार मुंबई बँकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शून्य टक्के व्याजदराचे गणित कसे जुळले?
मुंबई बँकेकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणारा कर्जपुरवठा साधारणपणे ९ टक्के व्याजदराने असतो. मात्र, काही शासकीय महामंडळांच्या योजनांमधून मिळणाऱ्या व्याजाच्या परताव्यामुळे हे कर्ज शून्य टक्के दराने मिळू शकेल.
प्रवीण दरेकर यांनी सांगितल्यानुसार, राज्य सरकारच्या चार महामंडळाच्या योजना अशा आहेत, ज्यांच्या माध्यमातून कर्जावरील १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो.
या चार महामंडळाच्या योजनांचा होणार फायदा:
- पर्यटन महामंडळाची ‘आई’ योजना: या योजनेतून महिलेला १२ टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा मिळतो.
- अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ
- भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ
- ओबीसी महामंडळ
या चारही महामंडळांकडून व्याजाचा परतावा मिळत असल्याने, मुंबई बँकेकडून कर्ज घेणाऱ्या आणि या महामंडळांच्या योजनेत बसणाऱ्या महिलांना कर्ज शून्य टक्के व्याजदरात उपलब्ध होऊ शकते.
कर्ज मिळवण्याची प्रक्रिया आणि लाभार्थी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या चारही महामंडळांच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय (GR) घेण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले आहेत.
- कर्ज मर्यादा: एका महिलेला १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
- गट व्यवसाय: ५ ते १० महिला एकत्र येऊन देखील व्यवसाय सुरू करू शकतात आणि कर्जासाठी अर्ज करू शकतात.
- अर्ज प्रक्रिया: मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर व्यवसायाच्या तपासणीनंतर कर्ज दिले जाईल. व्याजाचा परतावा थेट महामंडळांकडून मिळवण्याचा प्रयत्न बँक करेल.
- सध्याचे लाभार्थी: सध्या मुंबईतील १२ ते १३ लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, तर मुंबई बँकेकडे सुमारे १ लाख सभासद आहेत.
- सुरुवातीचा लाभ: सुरुवातीला ही योजना मुंबईतील महिलांना लागू असेल.